Thursday, May 3, 2012

यवतमाळ जिल्हा ४५४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी

यवतमाळ जिल्हा ४५४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी
यवतमाळ / वार्ताहर, शुक्रवार, ४ मे २०१२
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224794:2012-05-03-18-23-57&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60
पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ात फ्लोराईडयुक्त पाणी असलेली पाच दहा नव्हे तर चक्क ४५४ गावे असल्याची खळबळजनक माहिती असून या गावांना शुद्ध पाणी पुरवण्याची कोणतीच योजना आखण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात या गावांमध्ये निर्माण होणारे अनारोग्याचे संकट हासुद्धा सार्वजनिक चिंतेचा विषय झाला आहे.
पाणीटंचाई निवारण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्यासह प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. आढावा बैठकांचेही राजकारण सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सेना भाजप अपक्ष यांच्याशी आघाडी करून सत्ता मिळवली असली तरी खरी परीक्षा आताच सुरू झाली असून पाणीटंचाईचे संकट दूर करणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. आढावा बैठकांबरोबरच किती प्रमाणात जनतेची तहान शमवण्यात यश आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी दिली असून पाण्याचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, जिल्ह्य़ातील दोन हजार गावांपैकी ४५४ गावे फ्लोराईडयुक्त पाणी पितात हे अत्यंत कटू वास्तव असतानाही यापासून मंत्री, खासदार, आमदार हे सारेच अनभिज्ञ आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एम.रमेश कुमार यांनी रखरखत्या उन्हात जिल्ह्य़ातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी एकही गाव फ्लोराईडयुक्त पाणी पिणारे राहणार नाही, अशा योजना अंमलात आणण्याचे आदेश दिले होते. फ्लोराईडयुक्त गावांची संख्या नगण्य असून अशा दोन गावांना बैलगाडीने पाणीपुरवठा होतो, अशी त्यांना माहिती देण्यात आली होती. आर्णी तालुक्यातील सातारा गावात सत्यसाई सेवा समितीने एक यंत्र बसवून फ्लोराईडयुक्त पाणी फ्लोराईडमुक्त केले होते आणि त्या गावात पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे, असे प्रयोग युद्धस्तरावर होण्याची गरज असताना जिकडे तिकडे केवळ आढावा बैठकांचा व त्या बैठकांच्या राजकारणाचा सपाटा तेवढा सुरू आहे.
यवतमाळ, मारेगाव, पुसद, उमरखेड, केळापूर, वणी, झरी, घाटंजी, आर्णी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, राळेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३० ते ४० गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मात्र पाणीटंचाई आढावा बैठकांमध्ये या दुर्दैवी गावांची चर्चा होत नाही. असंख्य गावांमध्ये पाण्याचे स्रोतच फ्लोराईडयुक्त आढळल्याने त्या गावातील कूपनलिका बंद करून काही ठिकाणी गावकऱ्यांना पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे.
आतापर्यंत दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा होत होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी १५ गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निवडून तशी परवानगी दिली आहे. स्वातंत्र्याच्या ६४ वषार्ंनंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ५२ वर्षांनंतरही हजारो लोकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे.
हाडे ठिसूळ, हातपाय आणि दात वाकडे
पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे जे अशाप्रकारचे पाणी पितात त्यांना हाडे ठिसूळ होण्याच्या रोग होत आहे. दात गळून पडणे, हातपाय वाकडे होणे आणि हाडे ठिसूळ होणे अशा भयंकर रोगांना केवळ फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आमंत्रण दिले जाते. उल्लेखनीय म्हणजे, ग्रामीण भागात ही समस्या जास्त आहे, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्य़ातील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या असलेल्या गावांची संख्या राज्यात सर्वात जास्त असल्याची माहिती आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खर्च होतात, पण प्लोराईडयुक्त पाणी असलेली गावे फ्लोराईडमुक्त व्हावीत, यासाठी मात्र प्रयत्न कमीच पडले आहेत हे वास्तव आहे. फ्लोराईडमुक्तीचे अभियान चालवण्याची नितांत गरज असून लोकप्रतिनधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात उद्भवणाऱ्या मानवी संकटांना तोंड देणे कठीण जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.   

No comments: