Monday, August 5, 2013

यवतमाळ जिल्ह्यातील ३ लाख एकरमधील पिके उद्ध्वस्त

यवतमाळ जिल्ह्यातील ३ लाख एकरमधील पिके उद्ध्वस्त
ॅ स्थानिक प्रतिनिधी / यवतमाळ 
यवतमाळ जिल्ह्यात मागील पंधरवाड्यात झालेल्या अतवृष्टीमुळे व धरणाचे पाणी सोडल्याने आधीच ३ जूनपासून सतत पावसाचा मारा सहन करत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंदाजे ३ लाख एकरातील उभे पीक, पुरात बुडून खरडल्यामुळे व पावसाचे पाणी शेतात साचल्याने नष्ट झाले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असली तरी जिल्ह्यातील खा. हंसराज अहीर व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे याच परिसरात उद््घाटन व भूमिपूजन समारोह करीत फिरत आहेत. या लोकप्रतिनिधींना केव्हा जाग येईल व प्रशासन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची केव्हा मदत करेल असा संतप्त सवाल विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
घाटंजी तालुक्यातील भीमकुंड व गणेरी भागातील पुराचा फटका बसलेले शंभराच्यावर कुटुंबे जंगलातील माळावर जाऊन राहत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोहुर्ले यांनी दिली. यावर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांना किशोर तिवारी यांनी मदत करण्याची विनंती केली. दरम्यान रविवारी पारवा ग्रामपंचायतमध्ये एका समारंभाला आमदार व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. मात्र, या परिसरातील जनता आपणास मतदान करीत नाही तेव्हा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेत संपूर्ण परिसराकडे त्यांनी पाठ फिरविली, अशी माहिती तुकाराम मोहुर्ले यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नद्यांनी आपला कहर माजविला असून पैनगंगा लगतच्या पिंपरी, वठोली, टाकळी, दिग्रस, धानोरा, दुर्भा, सतपेल्ली, हिरापूर, मांगली, वेडद, खातेरा, उमरी, पिंपळखुटी, जुगाद, चिंचोली, शिवणी (धोबे) या गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडाण, अरुणावती, वर्धा नद्यांच्या पात्रातील शेतकर्‍यांची परिस्थिती या पेक्षाही बिकट आहे. मात्र, आजपर्यंत साधे पंचनामे किंवा पाहणी सुद्धा झालेली नाही. प्रत्येक नदी व नाल्याला महापूर आल्यामुळे सुमारे ३ लाख एकर जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.