Tuesday, May 15, 2012

चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांत फ्लोराईडयुक्त पाणी-लोकमत

 चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांत फ्लोराईडयुक्त पाणी-लोकमत 
थातूरमातूर उपाययोजना करून प्रशासनाकडून बोळवण
  दि. १५ (चंद्रपूर)
मायबाप सरकारचे दुर्लक्ष अन् प्रशासनाची दिरंगाई, यामुळे स्वातंत्र्याच्या साठीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. यापैकी १२ गावे अजूनही १00 टक्के फ्लोराईडयुक्त आहेत. फ्लोराईडची सर्वाधिक समस्या चिमूर तालुक्यात आहे. या तालुक्यातील ३८ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी आहे. गंभीर बाब ही की, फ्लोराईडयुक्त पाणी समस्येवर उपाययोजना केवळ कागदोपत्री आहेत.
जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात ६, भद्रावती २२, ब्रह्मपुरी ३, चंद्रपूर १६, चिमूर ३८, गोंडपिपरी ७, जिवती २, कोरपना १६, मूल १३, नागभीड १६, पोंभुर्णा १५, राजुरा १४, सावली ११, सिंदेवाही २९, तर वरोरा तालुक्यातील ३२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. तर येनबोडी (बल्लारपूर), शेलोटी, कोंडेगाव (माळ) (भद्रावती), वलनी, वेंडली (चंद्रपूर), बरडघाट, वाघळपेठ (चिमूर), आसन (बु.) (कोरपना), उमरझरी (राजुरा), चिखल मिनघरी (सिंदेवाही), सुसा व भिवकुंड (वरोरा) ही गावे १00 टक्के फ्लोराईयुक्त आहे. यापैकी केवळ तीन गावांमध्ये पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ७५४ गावे आहेत. सन २00५ मध्ये जिल्ह्यातील १३ हजार ७९५ स्त्रोतांचे रासायनिक तथा जैविक परीक्षण करण्यात आले होते. त्यापैकी २४0 गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण मानकापेक्षा जास्त म्हणजे १.५ पीपीएमपेक्षा अधिक आढळले होते. सद्यस्थितीत ३ हजार ८२ स्त्रोतांपैकी ५४८ स्त्रोत बाधीत असून २ हजार ५३४ स्त्रोत सुरक्षित आहेत. १00 टक्के बाधीत असलेली १२ गावे असून ७७ ते ९९ टक्के फ्लोराईडने बाधीत गावांची संख्या ३६ आहे. ५0 ते ६९ टक्के बाधीत असलेली ६३ गावे असून १ ते ४९ टक्क्यांमध्ये १२९ गावांचा समावेश आहे. ३१ मार्च २0१0 पर्यंंंत गावांमधील सुरक्षित स्त्रोत तसेच इतर उपाययोजनांद्वारे १४२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. फ्लोराईडने बाधीत २४0 गावांपैकी फक्त ४२ गावांमधील फ्लोराईडबाधीत स्रोतांवर फ्लोराईड रिमोव्हल संयंत्र बसविण्यात आले आहे. यासोबतच आणखी ४0 गावांमध्ये फ्लोराईड रिमोव्हल संयत्र बसविण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

No comments: