Sunday, October 4, 2009

रितेपणाच्या उमेदवार!- मृणालिनी नानिवडेकर

रितेपणाच्या उमेदवार!
मृणालिनी नानिवडेकर
Sunday, October 04th, 2009 AT 12:10 AM

बेबीताई बैस

महिनाभराच्या प्रचारात शेकडो लाखो कोटींचा खुर्दा उडतो. आश्‍वासनांचा धुरळा थेट आभाळाला भिडतो. जातीपातींची गणिते नव्याने तपासली जातात. लोकशाही पुन्हा पाच वर्षांनी घासूनपुसून स्वच्छ केली जाते. पण ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने "नाही रे' वर्गाच्या झोळीत प्रगतीची काही शिते टाकते का? बेबीताई बैस यांची वणी मतदारसंघातील उमेदवारी हाच प्रश्‍न पुढे करत असावी. कापूस उत्पादकांच्या विधवांच्या त्या प्रतिनिधी आहेत. आम्हाला या मतदानाच्या उत्सवात काही स्थान आहे का हे विचारण्यासाठी समोर आलेल्या! राहुल गांधींनी कलावतीबाईंच्या घरी भेट दिल्याने त्या अचानक "नॅशनल सेलिब्रिटी' होऊन बसल्या. घरात वास करणारे दारिद्य्र अंगावर येणारे. राजाने ते बघितले. स्वत:च्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देण्यासाठी अवघ्या देशासमोर ते मांडले. कलावतीबाईंच्या घरातल्या अभावाच्या सर्व जागा मग राहुल गांधींच्या प्रभावाने भरून गेल्या. दुःख सरले नाही; पण दैन्य मात्र सरले.
कलावतीबाई आत्महत्याग्रस्त महिलांचे आणि राहुल गांधींच्या आम आदमीबद्दलच्या कळवळ्याचे प्रतीक बनल्या. त्यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी या प्रतिकात्मकतेचा वापर करणारीच होती. बाईंचे घर उदार हाताने दिलेल्या देणग्यांनी भरून टाकणाऱ्या व्यवस्थेला त्यांची उमेदवारी सहन होईलच कशी? झपाट्याने चक्रे फिरली आणि कलावतीबाई रिंगणातून बाहेर पडल्या. त्यामुळे आता कलावतीबाईंऐवजी बेबीताई रिंगणात अवतरल्या आहेत. त्यांच्यामागे "स्टार स्टेटस' नाही. मतदानप्रक्रिया, निवडून येणे, एखाद्याला पाडणे, याबद्दल त्यांना काही माहिती असण्याची शक्‍यताही नाही. त्यांची उमेदवारी प्रतीकात्मक आहे. लोकशाही व्यवस्थेत आमच्यापर्यंत काहीच पोचत नसल्याची बोचरी जाणीव जनतेपर्यंत, निदान माध्यमांपर्यंत जावी, यासाठीची ती उमेदवारी.
विदर्भात सातत्याने पैसा ओतूनही अनाथ झालेल्या झोपड्यांची, रित्या मनांची कहाणी सांगणे हेच या उमेदवारीचे उद्दिष्ट. कलावतीबाई किंवा बेबीताई जिंकणार तर नाहीत, कोणाला पाडण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. त्यांच्या मागे असणाऱ्या आंदोलकांनाही याची जाणीव असावी; मात्र सातत्याने चर्चेत आलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न आजही किमान दहा हजार कुटुंबांच्या जीवनात कोणतीही आशा जागवू शकलेला नाही. बेबीताई या भाळावरचे कुंकू पुसल्या गेलेल्या सहा हजार शेतकरी विधवांच्या प्रतिनिधी. छोट्याशा जनिमीवर भल्या थोरल्या कुटुंबाची जबाबदारी. मुलांची, त्यांच्या लग्नाची शिक्षणाची; शिवाय पतीच्या डोक्‍यावर असलेल्या कर्जाची वास्तपुस्त मागे राहिलेल्या अर्धांगिनीने करायची. बेबीताईंकडे शेती चार एकर. म्हणजे थोडाथोडका मामला नाही. पण, शेतीला सिंचनच नसल्याने जमिनीचे काय करायचे, हा प्रश्‍न. ४२ वर्षांच्या या महिलेवर चार मुलांचे पालकत्व येऊन पडलेले. नवऱ्याने काढलेले ४७ हजारांचे कर्ज फेडायचा बाईंचा निश्‍चय. २००७ मध्ये नवऱ्याने विष तोंडाला लावले, तेव्हापासून बाई उभी आहे.
विदर्भात पर्यायी उत्पन्नासारखे दुधाचे व्यवसाय उभे नाहीत, की कोंबडीची अंडी विकून कनवटीला दोन पैसे जोडता येत नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे नेतृत्वाने इथे विकासाचा वेध कधी घेतलाच नाही. त्यामुळे बेबीताईंसारख्या कित्येक बायका विदर्भ जनआंदोलनाच्या किशोर तिवारींच्या माध्यमातून मिळणाऱ्या महिन्याच्या तीनचारशे रुपयांच्या मनीऑर्डरची आतुरतेने वाट पहायच्या. बेबीताई आंगणवाडी मदतनीस म्हणून काम करायला तयार; पण तशी संधी मिळणे शक्‍य नाही. आता मुलींचे दोनाचे चार हात करण्याची वेळ आलेली. एखाद्या सहृदयी माणसाने जरा मदत केली, की चर्चा झालीच सुरू. बेबीताई म्हणजे कोणी समाजसेविका नाहीत. हजारो महिलांन
ा नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्या अंगी नाहीच; पण पंचक्रोशीतल्या अशा तरुण विधवांना आश्रय देण्याचे काम त्या आपल्या परीने करताहेत. वणी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी त्यांच्या बरोबरीने अशाच महिला मालमजुरीचे काम सांभाळून दारोदारी फिरतात. कलावतीबाईंच्या स्टंटबाजीसाठी माध्यमे महामार्ग सोडून त्यांच्या घरापर्यंत "ओबी व्हॅन' घेऊन गेली. आता तो "ड्रामा' संपल्याने बेबीताईंच्या उमेदवारीकडे कुणाचे लक्ष नाही. राहुल गांधी ना त्यांच्याकडे गेले, ना त्यांचे नाव लोकसभेत गाजले. चेहरा नसलेल्या, नावगाव माहिती नसलेल्या खऱ्या करुण कहाणीतील बेबीताईंसारख्या सहा हजार महिला वंचिताचे जगणे पुढे रेटताहेत. एका निवडणुकीत उभे राहून या समस्येकडे मतांच्या मारामारीत गुंतलेल्या राजकीय प्रक्रियेचे लक्ष काही वेळासाठी तरी त्या वेधू शकतील का? शंकाच आहे!

No comments: